Tuesday, 20 July 2021

राजगड येथे विमानतळ सुरू करून हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे - खासदार हेमंत पाटील

राजगड येथे विमानतळ सुरू करून  हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे - खासदार हेमंत पाटील
माहूर (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील राजगड येथे १९८० च्या दशकात  प्रस्तावित करण्यात आलेली विमान धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानताळात रूपांतर करण्यात यावे सोबतच  हवाई सुंदरी आणि वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया )यांच्याकडे केली आहे.
         प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात किनवट तालुक्यातील जवराला आणि बुधवार पेठ या गावातील आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजाचे प्रसिद्ध  ढेमसा हे आदिवासी नृत्य सादर केले होते.त्यामुळेच  श्रीमती इंदिरा गांधी यांनी या दोन्ही गावांना भेटी देऊन त्याठिकाणीची संस्कृती त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचा आणि  सहभागी कलाकारांना भेटण्याचा  मनोदय  व्यक्त केला होता, इंदिरा गांधी येणार असल्याने त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर त्याभागात  उतरावे आणि त्यांना या   दोन्ही गावांना जाता यावे म्हणून जवळचा पर्याय  राजगड असल्याने त्याठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर  सन १९८० च्या दशकात   रोजगार हमीच्या कामावरील  मजूरांच्या साहाय्याने धावपट्टी तयार करण्यात आली होती.पुढे काही कारणास्तव इंदिरा गांधी यांचा नियोजित दौरा रद्द झाला. नंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडीनंतर   या धावपट्टीची शासन दरबारी केवळ कागदोपत्री नोंद करण्यात आली.पुढे यावर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही आणि हे ठिकाण आहे त्या स्थितीमध्ये उपेक्षित राहीले . खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजगड येथे भेट दिली होती.तेव्हापासून या धावपट्टीला पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळामध्ये रुपांतर करावे,याठिकाणाहून  विमान वाहतूक सुरू करण्याचा मनोदय त्यांच्या मनी होता त्या अनुषंगाने त्यांनी आज ( दि.२०) रोजी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया)यांची भेट घेतली यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयांना या भागाची आणि संबंधित धावपट्टीची पार्श्वभूमी सांगितली आणि याठिकाणी पुन्हा ही धावपट्टी सुरू करून त्याचे विमानतळामध्ये रूपांतर करावे तसेच  वैमानिक आणि हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे जेणेकरून याभागातील आदिवासी बहुल समाजातील तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले. याठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद नंतर कुठेच विमानतळ नव्हते आणि  नांदेड जिल्ह्यातील  ही पहिलीच धावपट्टी होती. नांदेड चे विमानतळ यानंतर तयार करण्यात आले हे विशेष.हे विमानतळ  कार्यन्वित करण्यात आल्यास विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, आणि संबंध हिंगोली लोकसभा मतदारसंघ सोबतच आंध्रप्रदेश मधील आदीलाबाद, निझामाबाद,निर्मल या ठिकाणच्या जनतेला सोयीचे होऊन विमानसेवेचा मार्ग सुकर होईल तसेच गडचिरोली आणि किनवट मधील नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राज्य राखीव जवानांच्या (सीआरपीएफ ) तुकड्या  उतरविण्यासाठी या विमानतळाचा उपयोग होऊ शकतो असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. सोबतच नांदेड -मुंबई आणि नांदेड-दिल्ली-पुणे ही विमानसेवा नियमित सुरू करावी जेणेकरून याठिकाणी ये - जा करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल.सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे किनवट आणि आजूबाजूच्या परिसरात व  संबंध हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील व पर्यायाने मतदारसंघाचा विकास होईल.

No comments:

Post a Comment