माहूर शहरात तिन ठिकाणी घरफोडी.एकाच घरातून 6 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला
विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी ) माहूर शहरात दि.23 जुलैच्या मध्यरात्री नंतर अज्ञात चोरांनी ब्राम्हण गल्लीतल्या संतोष राजाभाऊ जोशी यांच्या घरातील लॉकर तोडून 6 रोख 21 हजार रुपयाची रोख रक्कम व 98 हजार रुपये किंमतीच्या सोन्या चांदीच्या मौल्यवान दागिन्यावर ताव मारला. यासंदर्भात जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलीसांनी कलम 457,380 नुसार अज्ञात चोरा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
माहूर शहरात शुक्रवारला मध्यरात्री नंतर रात्री 12 ते सकाळी 4 वाजताचे दरम्यान चोरट्यांनी संतोष जोशी यांच्या घरातील ईतर दारांची प्रथम कडी लावली.त्यानंतर तळमजल्यातील खोलीतले लॉकर तोडून जबर चोरी केली.त्याच रात्री साई रेणुका नगरीत विजय रामदास घाटे यांच्या घरातील 3 भाडेकरूंच्याही खोलीचे दार तोडून काही मुद्देमाल लंपास केला.त्या तिन्ही खोलीत दोन शिक्षक व वाई बाजार येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यरत असलेले कर्मचारी सुट्टी निमित्त गावाकडे गेल्याने पोलीसात तक्रार दाखल झाली नाही.
फिंगर प्रिंट यूनिट हेडचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कठाळे व डॉग स्कॉडचे पथक शहरात दाखल झाले असून जून नावाच्या कुत्रीला घेवून त्यांनी तपास केला.घटनेची माहिती मिळताच सकाळीच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांचे नेतृत्वात स.पो.नि.नामदेव मद्दे,अण्णासाहेब पवार,बिट जामदार विजय आड़े,ठाणे अंमलदार बाबु जाधव,पो.कॉ.चंद्रप्रकाश नागरगोजे,योगिनाथ पाटील,प्रकाश देशमुख,साहेबराव सगरोळीकर यांनी प्रत्यक्ष स्थळी धाव घेवून पंचनामा केला. पुढील तपास स्वतः मद्दे हेच करीत आहेत.
संतोष जोशी यांचेकडे 7 लाख 19 हजार रुपयाच्या चोरी प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून शहरात रात्रीला गस्ती सुरू आहे.तसेच घाटे यांच्या घरातील भाडेकरू बाहेर गावी असल्याने अद्याप पर्यंत तक्रार दाखल झाली नाही.शहरातील सर्वच सी.सी.टीव्ही तपासल्या जाणार असल्याचे नामदेव मद्दे यांनी सांगितले.
एकाच महीन्यात माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या दत्त मांजरी येथे झालेला खून व रात्री झालेल्या जबरी चोरीने पोलिसा समोर नवे आव्हान उभे केले आहे.