जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हयात वृक्ष लागवड मोहिम- सिईओ वर्षा ठाकूर
नांदेड (प्रतिनिधी ) - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक 5 जून रोजी नांदेड जिल्हयात वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्यात येणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, विविध कार्यालयाच्या जागा व गावात दुतर्फा वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या काळात रूग्णांना कृत्रिम प्राणवायूची गरज मोठया प्रमाणात जाणवली. या आपत्तीमधून प्राणवायूची मानवाला असलेली गरज ही प्रकर्षाने आधोरेखीत झाली. या बाबी विचारात घेता मोठया प्रमाणावर जिल्हयात वृक्ष लागवडीची मोहिम पावसाळी हंगामात हाती घेण्यात येणार आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध मोकळया जागेत, शेतात, बांधावर, पडीक जमीनीवर, रस्ता दुतर्फा, नदी, नाल्याच्या काठावर वृक्ष लावगड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीच्या लोकचळवळीत नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
या मोहिमे अतंर्गत प्रत्येक व्यक्तींने किमान 3 झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्ती 3 वृक्ष याप्रमाणे जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामीण भागात सुमारे 72 लाख 66 हजार 126 वृक्ष लागवडीचे उदिष्ट आहे. यासाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांच्यास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. या पावसाळयात हे उदिष्ट साध्य करण्यात येणार आहे. याशिवाय मियावाकी पध्दतीने गावातील मोकळया जागा, शासकीय कार्यालय परिसरात एक हजार प्लॉटमध्ये झाडे लावण्यात येणार आहेत. तरी तालुकास्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी वृक्ष लागवडीचे नियोजन करुन दिनांक 5 जून रोजी वृक्ष लागवडीचा शुभारंभ शासनाच्या कोवीड-19 सुचनांचे पालन करुन करण्यात यावे असे सुचित करण्यात आले आहे. या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक-युवती, अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेवून वृक्ष लागवडीची मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment