Tuesday, 22 October 2019

उच्च प्रतीची कौशल्ये आत्मसात करणे हाच विकासाचा नवा मंत्र स्वारातीम विद्यापीठाच्या पुरस्कार वितरण समारंभात एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंठा यांचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. गोपाळराव पाटील जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित

 
 नांदेड (प्रतिनिधी) - आर्थिक विकास हा रोजगार वाढीला आवश्यक आहे. पण अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे तिचेच विकास होत असतो हेही तितकेच खरे आहे. अलीकडे बड्या उद्योगांनी रोजगारात कपात करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे  रोजगारासाठी युवकांना आता पुनर्कौशल्ये आणि उच्च प्रतीची कौशल्ये आत्मसात करावी लागतील, हाच विकासाचा नवा मंत्र आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. एस एस मंठा यांनी केले. 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्कार व इतर पुरस्कारांचे वितरण डॉ. एस एस मंठा यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे उपस्थित होते. तर यावेळी मंचावर शिक्षणतज्ञ माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे उपस्थित होते. 
डॉ. एस एस मंठा म्हणाले,” उत्पादनाच्या व सेवेच्या क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. कृषि तंत्रज्ञानामुळे कमी मुदतीत अधिक लाभ मिळू शकतो. सध्या द्रुतगती महामार्गाची उभारणी मोठ्या प्रमाणात होत आहे पण या मार्गावर अपघातात सापडलेल्यांना मदत करू शकणार्‍या केंन्द्राची वाणवा आहे, या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले आयुष्य हा खेळ आहे पण या खेळाला निश्चीत नियम नाहीत. पण आलेल्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यात खरा आनंद आहे.
     शिक्षणतज्ञ माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांचा विद्यापीठाच्यावतीने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले. शाल, पुस्तक, स्मृतिचिन्ह आणि पंचवीस हजार रुपयाचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना गोपाळराव पाटील म्हणाले, मुलांच्या मेंदूची वाढ त्याच्या सहा वर्षापर्यंत होते हा काळ खूप महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य यांची काळजी याच वयात घेणे खूप गरजेचे आहे. आपला हा गौरव संस्थेतील माझ्या सर्व सहकार्यांच्या मेहनतीचे फलित आहे.अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी विद्यापीठात संस्कृत विषयात पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थांसाठी दोन सुवर्णपदकांची त्यांनी घोषणा केली.
 
यावेळी विद्यापीठ परिसरातील वर्ग-३ चा पुरस्कार वरिष्ठ लिपिक विष्णू भुसारे, शिवाजी चांदणे यांना देण्यात येणार आहे तर वर्ग-४ चा पुरस्कार काळबा हनवते, बाबुराव हंबर्डे यांना गौरविण्यात आले. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील संलग्नित महाविद्यालयात  कार्यरत गुणवंत कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा वर्ग-४ चा उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुरस्कार शिवाजी महाविद्यालय, उदगीरच्या सौ.उषा नावंदे आणि शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालय, नळेगाव, ता.चाकुरच्या ऋषिकेश शिरुरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट विद्यापीठ संकुलीय शिक्षक पुरस्कार- डॉ. रमजान मुलाणी, उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक ग्रामीण विभाग पुरस्कार- प्रोफेसर डॉ. एन. टी. कांबळे (शिरूर ताजबंद), उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक शहरी विभाग पुरस्कार- डॉ. ई.यू. मासुमदार (लातूर), उत्कृष्ट प्राचार्य ग्रामीण विभाग पुरस्कार- प्राचार्य डॉ. बी. डी. इंगळे(नायगाव बाजार), उत्कृष्ट प्राचार्य शहरी विभाग पुरस्कार- प्राचार्य डॉ. वसंत भोसले(परभणी), उत्कृष्ट महविद्यालय ग्रामीण विभाग पुरस्कार -श्री गुरुबुद्धी स्वामी महविद्यालय, पूर्णा, उत्कृष्ट महविद्यालय शहरी  विभाग पुरस्कार -  श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय, लातूर यांना शाल, पुस्तक, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात डॉ. वसंत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले, जीवनात जशी ध्येय महत्वाची तितकेच आदर्श देखील महत्वाचे असतात. पण दुर्दैवाने आज असे आदर्श कमी होत चालले आहेत. उभारी देणार्‍या हातांऐवजी उगारणारे हात वाढले आहेत. श्री गोपाळराव पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत आपल्या आशीर्वादाच्या हाताने असंख्य सामान्य माणसांना जीवनात उभे केले आहे. लातूरने शिक्षणक्षेत्राला दिलेला “’लातूर पॅटर्न’” घडविण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे, आभाळाला हात पोहचले तरी त्यांनी जमिनीशी असणारे आपले नाते तोडले नाही. हा श्री गोपाळराव पाटील यांचा आदर्श नव्या पिढीने आत्मसात करावा, असे ही त्यांनी सांगितले.
कार्याक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजेन्द्र गोणारकर यांनी केले. यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, पांडे , विद्यापीठाचे संवैधानिक अधिकारी, विविध प्राधिकरणाचे पदाधिकारी व शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment