नटराजन आणि ज्योतिरादित्य
भाऊ तोरसेकर
सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, हेमंतो विश्वशर्मा असे अनेक तरुण काँग्रेस नेते आपली सर्वशक्ती व बुद्धी पणाला लावून कामाला लागले होते. त्यांनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी गंभीर मानली व आपल्या कर्तृत्वावर पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प हाती घेतला. त्यांची गुणवत्ता व क्षमता नजरेत भरू लागताच राहुलसह सोनिया, प्रियंका यांना हे लोक अडचण वाटू लागले. पक्ष बुडाला तरी चालेल, पण आपल्या कुटुंबापेक्षा अन्य कोणाकडे गुणवत्ता वा पात्रता असता कामा नये, हे गांधी घराण्याने कवचकुंडल बनवून ठेवलेले आहे. त्यालाच ज्योतिरादित्य शिंदेंसारखे तरुण धोका निर्माण करू लागले; मग त्यांची कोंडी करण्याशिवाय काँग्रेसकडे कोणताही पर्याय नव्हता..
मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते आणि राहुल गांधींचे विश्वासू सहकारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्याने त्या राज्यातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार घुसमटले आहे. कदाचित येत्या काही दिवसांत तिथे सत्तांतर होऊ शकेल. आणखी एक राज्य काँग्रेसच्या हातातून निसटलेले असेल, पण कोणाला त्याची पर्वा आहे काय? बाकीच्यांचे सोडून द्या, ज्यांना भारत किंवा काँग्रेस पक्ष ही आपली वडिलोपार्जित मालमत्ता वाटते, त्या गांधी कुटुंबाला तरी पक्षाचा होत असलेला ऱ्हास कधी चिंतेत टाकू शकलेला आहे काय? निदान त्यांचे वागणे व बोलणे यातून त्याचा मागमूस दिसत नाही. असता, तर त्यांनी पाच वर्षापूर्वीच अशा नाराज आवाजांची दखल घेऊन ढासळत चाललेल्या काँग्रेसची डागडुजी सुरू केली असती. कारण जयंती नटराजन यांच्यापासून त्याची सुरुवात झाली आणि आज त्यांचे नावही कोणा काँग्रेस नेत्याला आठवणार नाही. जानेवारी २०१५ मध्ये जयंती नटराजन यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता आणि राहुल गांधी यांच्या कार्यशैलीविषयी काही गंभीर आरोप केले होते. खरेतर त्यांना आरोपही मानता येणार नाही. नटराजन यांनी काही आक्षेप घेतलेले होते. पण कोणाला पर्वा होती? गांधी कुटुंबीयांसाठी अशी नेतेमंडळी वा कार्यकर्ते पेचप्रसंग आल्यावर बळी जाण्यासाठीच पक्षात आहेत किंवा असावीत. त्यांनी नेहरू-गांधी वारसांच्या मेहेरबानीने सत्तेचे सुख भोगायचे असते आणि उपयोग संपल्यावर निमूटपणे बळीचा बकरा व्हायचे असते. त्याविषयी तक्रार केल्यावर तत्काळ त्यांना गद्दार ठरवून निंदानालस्तीचा भडीमार सुरू होत असतो. जयंती नटराजन यांनी सुरुवात केली आणि आता विषय ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्यापैकी कितीजणांना नटराजन मॅडम आठवतात? त्यांची तक्रार तरी काय होती? त्यांनी काँग्रेस पक्ष कशाला सोडला होता?
२०१४ च्या निवडणुका होऊन देशात मोदींचे सरकार येण्यापूर्वीची गोष्ट आहे. राहुल गांधींना खेळणे वाटणारे मनमोहन सरकार सत्तेत होते आणि त्यामध्ये जयंती नटराजन या तामिळी नेत्या राज्यमंत्री होत्या. त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय होते आणि त्यांनी राहुल गांधींच्या इच्छेखातर अनेक राज्यातील विकास व उद्योग प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालयाचा तांबडा कंदील दाखवून ठप्प केलेले होते. ओडिशातील वेदांत नावाच्या प्रकल्पाचा प्रदेश आदिवासी वस्तीचा होता आणि तिथे राहुल गांधींनी भाषण करताना प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी मंत्री म्हणून जयंती नटराजन यांनी केलेली होती. पण अशा प्रकारामुळे उद्योगजगत नाराज झाले होते आणि लोकसभा निवडणुका दारात उभ्या राहिल्या असताना त्याचा चटका राहुलना जाणवला. मोदींनी भाषणांचा धुमधडाका लावला होता आणि विविध मंचांवर त्यांच्या विकासकामांचे गुणगान सुरू झालेले होते. साहजिकच अशा पक्षबाह्य कुठल्या नामवंत मंचावर राहुलना झळकायचे होते. त्यासाठी उद्योगपतींची संघटना असलेल्या संस्थेला काँग्रेसकडून साकडे घालण्यात आले, तर पर्यावरण मंत्रालयाच्या अडवणुकीवर बोट ठेवून त्याला नकार मिळाला. तेव्हा राहुलनी नटराजन यांची हकालपट्टी करून तिथे जयराम रमेश यांना नेमणूक दिली आणि ठप्प झालेल्या प्रकल्पांचे खापर नटराजन यांच्या माथी ठोकून उद्योगपतींची वाहव्वा मिळवली. त्या हकालपट्टीच्या निमित्ताने खुलासा मागण्यासाठी २०१४ च्या पूर्वार्धात नटराजन यांनी राहुल गांधींना सविस्तर पत्र पाठवले होते. कारण राहुलच्याच इच्छेखातर प्रकल्प रोखण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मग त्याचे खापर आपल्या माथी कशाला फोडता, असा साधा सवाल होता. पण त्याचा खुलासा त्यांना पुढल्या दीड वर्षात मिळाला नाही. दरम्यान राहुलनी काँग्रेसचा धुव्वा उडवून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलेले होते.
सत्ता गेली, पण गांधी कुटुंबाचा रुबाब संपला नाही की मस्ती उतरली नाही. त्यामुळेच लोकसभा निकालानंतर नटराजन यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही त्यांना राहुलची भेट मिळाली नाही, की खुलासा मिळाला नाही. म्हणून अखेरीस २०१५ च्या आरंभी त्यांनी आपल्या वतीने जगासमोर सत्य मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यात सत्य मांडण्यापूर्वी अर्थातच ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून दिलेला होता. त्यांनी आपले दुखणे पत्रकारांना कथन केले, त्यात आपण राहुलच्या आग्रहास्तव पर्यावरण खात्याकडून विविध प्रकल्पांना स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले. पण विषय तितकाच नव्हता. एके दिवशी तत्कालीन पंतप्रधानांनी म्हणजे मनमोहन सिंग यांनी त्यांना बोलावून राजीनामा मागितला. कशासाठी त्याचा खुलासा केला नव्हता. पण मॅडम म्हणजे सोनिया गांधी नटराजन यांच्यावर नवी जबाबदारी सोपवणार असल्याने सरकारी जबाबदारीतून त्यांना मुक्त करीत असल्याचे सिंग यांनी सांगितले होते.
लोकसभा निवडणुका जवळ असल्याने आपल्यावर काही पक्ष संघटनेची जबाबदारी येणार अशा प्रतीक्षेत नटराजन होत्या. पण त्यापैकी काहीच घडले नाही आणि नटराजन नावाची कोणी महिला पक्षात असल्याचेही गांधी कुटुंबाला लक्षात राहिले नाही. त्यामुळेच नटराजन यांना जाहीर खुलासा करावा असे वाटले. त्यांच्या राजीनाम्याविषयी नंतर राहुलना विचारण्यात आले असताना त्यांनी नटराजन या कोणी ज्येष्ठ नेता नसल्याचे सांगून टाकले. ही नटराजन यांची पक्षातली म्हणजे पर्यायाने गांधी कुटुंबासाठीची किंमत होती. बहुतांश काँग्रेस नेत्यांची तितकीच किंमत असते. मेहेरबानी चालू असेल तोवर त्यांनी रुबाब मारावा आणि मिरवावे. काम संपले मग त्यांची रवानगी कच-याच्या ढिगामध्ये होत असते. हा अनुभव नटराजन यांचाच एकटय़ाचा नव्हता. मागल्या पाच-सहा वर्षात अशा अनेकांना त्याच मार्गाने कच-यात जमा व्हावे लागले किंवा त्यांनी कच-यात फेकले जाण्यापूर्वी स्वतंत्रपणे आपला रस्ता शोधला. ज्योतिरादित्य त्याच रांगेतला नवा मोहरा आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिल्यावर त्यांचा १८५७ पर्यंतचा जुना इतिहास राहुलनिष्ठ मंगळवारी जनांनी कसा खणून चव्हाटय़ावर आणला, ते आपण बघतोच आहोत. पण नटराजन यांची इतकीही दखल घेतली गेलेली नव्हती. कारण उघड होते.
नटराजन यांच्यामुळे कुठल्या राज्यातली सत्ता डळमळीत होणार नव्हती किंवा राहुल, प्रियंका यांना कुठे उत्तर देण्याची पाळी येणार नव्हती. दोन दिवस डोके आपटून घेतील आणि पत्रकार मंडळीही चार-पाच दिवसांत त्यांच्याकडे पाठ फिरवून नव्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे धावू लागतील, याची गांधी कुटुंबाला खात्री होती. झालेही तसेच. ज्योतिरादित्य शिंदे यांची कहाणी वेगळी आहे. त्यांच्यासह अनेक तरुण वा पन्नाशीच्या आतले तरुण काँग्रेसचे नेते आहेत, ज्यांना याच हेतूने महत्त्वाच्या जागी बसवण्यात आले. जसे मनमोहन सिंग किंवा चिदंबरम यांना नेमणुका मिळाल्या. त्यांनी कठपुतळी बाहुलीप्रमाणे तालावर नाचावे, इतकीच अपेक्षा होती. त्यांच्यापाशी कुठलेही कर्तृत्व नाही, ही समजूत त्यांची खरी गुणवत्ता होती. पण, सचिन पायलट, शिंदे, आसामचे हेमंतो विश्वशर्मा असे अनेक तरुण काँग्रेस नेते, आपली सर्वशक्ती व बुद्धी पणाला लावून कामाला लागले होते. त्यांनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी गंभीर मानली व आपल्या कर्तृत्वावर पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प हाती घेतला. त्यांची गुणवत्ता व क्षमता पत्रकार माध्यमांच्याही नजरेत भरू लागली आणि तिथेच राहुलसह सोनिया, प्रियंका यांना हे लोक अडचण वाटू लागले. त्यामुळेच त्यांना खडय़ासारखे बाजूला करणे वा दुर्लक्षित ठेवून पक्षाच्या बाहेर पडायला भाग पाडणे, ही रणनीती बनून गेली. पक्ष बुडाला तरी चालेल, पण आपल्या कुटुंबापेक्षा अन्य कोणाकडे गुणवत्ता वा पात्रता असता कामा नये, हे गांधी घराण्याने कवचकुंडल बनवून ठेवलेले आहे. त्यालाच ज्योतिरादित्य शिंदेंसारखे तरुण धोका निर्माण करू लागले; मग त्यांची कोंडी करण्याला पर्याय तरी कसा उरेल?
गुलाम म्हणून वागणारे व आपली बुद्धी वापरण्याची हिंमतही नसलेले चिदंबरम, मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद वा दिग्विजय सिंग म्हणून ज्येष्ठ वा अगत्याचे असतात. दिग्गीराजा २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निकालापूर्वी काय म्हणाले आठवते? काँग्रेसने बहुमताचे यश मिळवले, तर श्रेय राहुल गांधींचे असेल आणि अपयश आलेच, तर ते आम्हा कार्यकर्त्यांचे असेल. याला वैचारिक निष्ठा म्हणतात. आपण आदेशानुसार काम करावे आणि आपले डोके वापरायचे नाही, ही आता काँग्रेस कार्यकर्ता, नेत्याची व्याख्या झालेली आहे. आपण कर्तृत्वशून्य आहोत आणि जगातले काहीही नेहरूंच्या वारसामुळेच घडते, या सिद्धांतावर विश्वास असण्याला गुणवत्ता मानले जाते. नटराजन वा इतर बहुतेक नेत्यांना तेच समजून घेता आले नाही किंवा ज्योतिरादित्य शिंदेंना ते समजायला १८ वर्षे लागली. जसजसा त्याचा साक्षात्कार होत आहे, तसतसे काँग्रेसचे नेते बाहेर पडत आहेत आणि ज्यांना तितकी हिंमत नाही, त्यांना पळवून लावण्याची योजना आझाद, पटेल वा अन्य श्रेष्ठींनी कायम सज्ज ठेवलेली असते. शिंदे त्याचेच बळी झालेले आहेत. मोदींच्या नसलेल्या चुका वा गुन्ह्याचा जाब विचारण्याची कुवत तुमच्यात असली पाहिजे. पण, येस बँकेचा संस्थापक दिवाळखोर राणा कपूर दोन कोटी रुपये मोजून प्रियंकाकडून कुठले तैलचित्र कशाला खरेदी करतो, असा प्रश्नही पडणार नाही, अशी ‘तल्लख’ बुद्धी तुमच्यापाशी असायला हवी, तर तुम्हाला भवितव्य नसलेल्या काँग्रेस पक्षात भवितव्य आहे. त्यापेक्षा आपल्या सारासार बुद्धीने चालण्याची इच्छा वा कुवत असलेल्यांना पक्षात स्थान नाही. कारण, तुम्ही राहुल, प्रियंका वा त्यांच्या पुढल्या पिढीतल्या रेहान वगैरेंसाठी आव्हान होण्याचा धोका असतो ना? त्यापेक्षा पक्षाला रामराम ठोकून इतरत्र व्यवस्था बघावी किंवा मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे बुद्धी गहाण टाकून राहुलच्या नेतृत्वात काम करण्यात पुण्य शोधावे. ज्योतिरादित्य शिंदे यांना कर्तबगारीने काही मिळवायचे आहे आणि नटराजन यांना आपण कुठे चुकलो, त्याचे उत्तर हवे होते. त्यांना काँग्रेस पक्षात काय स्थान असू शकते?