Monday, 4 November 2019

‘त्या’ 10 आमदारांची हकालपट्टी करावी 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सोनिया गांधी यांना निवेदन
प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेस पक्षातून फुटलेल्या आणि भाजपात सामील झालेल्या 10 आमदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारे निवेदन गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केले आहे. सध्या या प्रकरणी काँग्रेस पक्षाने सभापतींकडे अपात्रता याचिका दाखल केली असून त्याचा निकाल काय लागतो याची प्रतीक्षा काँग्रेस पक्षाने चालविली आहे.
गोवा राज्याचे काँग्रेस निरीक्षक डॉ. चेल्लाकुमार यांच्याकडे ते निवेदन देण्यात आले असून त्यांनी सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहचले आहे. त्या निवेदनाचा व एकंदरित राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्याचे उत्तर गांधी यांनी डॉ. चेल्लाकुमार यांच्यामार्फत दिले आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीने काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत त्या 10 आमदारांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करून तसा ठराव एकमताने संमत केला होता. त्याची प्रत निवेदनासोबत जोडण्यात आली आहे. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने देखील तसाच ठराव संमत केला होता. तोही निवेदनासोबत सादर करण्यात आला आहे.

चोडणकर व इतर काही पदाधिकारी त्यासाठी दिल्ली येथे गेले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते वेणुगोपाल यांचीही त्यांनी भेट घेऊन संघटनात्मक व राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

No comments:

Post a Comment